'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:00 PM2022-11-02T15:00:26+5:302022-11-02T15:04:08+5:30
तरुणीचे अश्लील फोटो धाडले तिच्या नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना, पुण्याच्या तरुणावर बीडमध्ये गुन्हा दाखल
बीड : इन्स्टाग्रामवरील ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाले. मात्र, तरुणाच्या मनात काही औरच होते. त्याने तरुणीला गोडीगुलाबीने जाळ्यात ओढले अन् अत्याचार केला. शरीरसंबंध व पैशांची मागणी करून तिला ब्लॅकमेल केले. तिने पैसे न दिल्याने तब्बल ५० मित्रमैत्रिणींना अश्लील फोटो पाठवून बदनामी केली.
३१ ऑक्टोबरला शिवाजीनगर ठाण्यात पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी बीडची रहिवासी असून, शेख शरीफ (रा. सांडस रांजणगाव, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिचे इन्स्टावर स्वत:चे अकाउंट आहे. या ॲपद्वारे तिची शेख शरीफशी २०२० मध्ये ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सॲपवरूनही एकमेकांशी बोलत. या ओळखीतून त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला पुण्यात बोलावून एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. तेथे तिला न कळू देता व्हिडिओ बनवला व अश्लील फोटोही काढले. त्याआधारे नंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केली.
आरोपी फरार
याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून ३१ ऑक्टोबरला विनयभंग, बलात्कार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस निरीक्षक केतन राठोड तपास करत आहेेत.
पीडितेच्या आईकडेही पैशांची मागणी
आईच्या मोबाइलवर संदेश पाठवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास व शरीरसंबंध न ठेवल्यास बदनामी करीन, अशी धमकी त्याने दिली. त्याने तिचा ई-मेल आयडी घेऊन सर्व मित्र व नातेवाइकांचे मोबाइल नंबर कॉपी करून घेतले. त्यानंतर एक दिवस अश्लील फोटो ४० ते ५० मित्रमैत्रिणींना पाठवून बदनामी केली.