अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला प्रेयसीच्या बापाचा काटा; बीड पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:23 PM2019-03-05T19:23:26+5:302019-03-05T19:25:52+5:30

हत्याऱ्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता.

lover murdered girl friend's father; Beed police dispute in 24 hours | अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला प्रेयसीच्या बापाचा काटा; बीड पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा 

अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला प्रेयसीच्या बापाचा काटा; बीड पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा 

googlenewsNext

बीड/सिरसाळा : परळी तालुक्यातील कवडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. यावेळी हत्याऱ्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करत अवघ्या २४ तासात याचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या. देवकते यांच्या मुलीच्या प्रियकरानेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

सुदाम हे गावातीलच माणिक भगवान कोळेकर यांच्याकडे वर्षभरपासून सालगडी म्हणून कामावर होते. २ मार्च रोजी भजन ऐकून शेतात परतल्यानंतर माणिकला सुदाम दिसले नाहीत.  त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसल्याने माणिकने आजबाजूच्या लोकांना बोलावून सुदामचा शोध सुरु केला. तेंव्हा शेतातील विहिरीच्या कडेला सुदामचे बूट दिसले. त्यानंतर विहिरीत पहिले असता आतमध्ये सुदामचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वानपथक आणि फोरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, खुन्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने प्रकरण किचकट झाले होते. 

मुलीच्या वर्तनातून आला संशय

प्रथमदर्शनी हा प्रकार चोरीचा असावा अशी शक्यता समोर आली होती. मात्र, आखाड्यावर कुठलीच वस्तू चोरीला गेली नसल्याने पोलिसांनी इतर दिशांनी तपासकार्य सुरु केले. दरम्यान, मयताच्या घटस्फोटीत मुलगी सविता (नाव बदलले आहे) हिचे गावातील अंकुश कोळेकर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अंकुशला ताब्यात घेतले. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अंकुशने पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच सुदामचा खून केल्याची कबुली दिली. 

शेतमालक कीर्तनला गेल्याची सांधली संधी 
२ मार्च रोजी सुदाम व शेतमालक माणिक शेतात मुक्कामी गेले होते. मात्र एकादशी असल्याने माणिक हे बाजूच्या वस्तीवर भजन ऐकण्यासाठी गेले. त्यामुळे शेतात सुदाम एकटेच झोपले असल्याची संधी साधून अंकुशने लाकडी दंडुक्याने त्यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किरकोळ शरीरयष्टीचे सुदाम बेशुद्ध पडले. त्यानंतर रक्त पाहून घाबरलेल्या अंकुशने त्यांना फरफटत नेऊन विहिरीत टाकले. सुदामने आत्महत्या केल्याचे भासावे यासाठी अंकुशने त्यांचे बूट आणून विहिरीजवळ ठेवले होते. 

तपास करणाऱ्या टिमला ‘रिवॉर्ड’
हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, डॉ.अर्जून भोसले, सिरसाळ्याचे सहा. निरीक्षक साहेबराव राठोड, उपनिरीक्षक जनक पुरी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. याप्रकरणी गोपनीय माहिती काढून तत्परतेने आरोपीस बेड्या ठोकल्याबद्दल पोलीस कर्मचारी रमेश सिरसाट, भास्कर केंद्रे, सचिन सानप, दिलीप गित्ते, विष्णू फड, अर्शद सय्यद यांचे पोलीस अधीक्षकांनी स्वागत करून त्याना ‘रिवॉर्ड’ जाहीर केला आहे.

Web Title: lover murdered girl friend's father; Beed police dispute in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.