प्रियकरानेच काढला प्रेयसीच्या बापाचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:40 PM2019-03-05T23:40:35+5:302019-03-05T23:41:00+5:30
परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती.
बीड/सिरसाळा : परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. हत्याऱ्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करत अवघ्या २४ तासात याचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या. देवकते यांच्या मुलीच्या प्रियकरानेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुदाम हे गावातीलच माणिक भगवान कोळेकर यांच्याकडे वर्षभरापासून सालगडी म्हणून कामावर होते. २ मार्च रोजी भजन ऐकून शेतात परतल्यानंतर माणिकला सुदाम दिसले नाहीत. त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसल्याने माणिकने आजबाजूच्या लोकांना बोलावून सुदामचा शोध सुरु केला. तेंव्हा शेतातील विहिरीच्या कडेला सुदामचे बूट दिसले. त्यानंतर विहिरीत पहिले असता आतमध्ये सुदामचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वानपथक आणि फोरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, खुन्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने प्रकरण कीचकट झाले होते. प्रथमदर्शनी हा प्रकार चोरीचा असावा अशी शक्यता समोर आली होती. मात्र, आखाड्यावर कुठलीच वस्तू चोरीला गेली नसल्याने पोलिसांनी इतर दिशांनी तपासकार्य सुरु केले. दरम्यान, मयताच्या घटस्फोटीत मुलगी सविता (नाव बदलले आहे) हिचे गावातील अंकुश कोळेकर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अंकुशला ताब्यात घेतले. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अंकुशने पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच सुदामचा खून केल्याची कबुली दिली.
सविताचे लग्न जमल्याने बिथरला अंकुश
घटस्फोटानंतर सविता दहा वर्षापासून माहेरीच राहत होती. सहा वर्षापूर्वी तिचे अंकुशसोबत अनैतिक संबंध जुळले. मात्र, काही दिवसांपूर्वी सुदामने सविताचे दुसरे लग्न शेजारच्या गावातील एका तरुणासोबत जमविले. लग्न जमल्यामुळे आपल्या संबंधातून मोकळे कर, अशी विनंती सविताने अंकुशला केली. त्यामुळे विरहाच्या कल्पनेने अंकुश बिथरला होता.
‘तुझ्या वडिलांचा काटा काढीन’ अशा धमक्या तो वारंवार सविताला देत असे. खुनाच्या दिवशी देखील त्याने फोनवरून तशी धमकी सविताला दिली होती. परंतु, तो नेहमीच असे बोलतो म्हणून तिने धमकीकडे दुर्लक्ष केले. सविताच्या भावी पतीला सुद्धा अंकुशने फोन करून धमकावले होते. असे तपासात समोर आले आहे.
अनैतिक संबंधामुळे दोन कुटुंबे उद्ध्वस्त
सुदामच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि एक दहा वर्षाचा मुलगा आहे. सुदाम हेच घरातील एकमेव कर्ता पुरुष होते. तर, अंकुश हा देखील विवाहित आहे. त्याच्या आणि सविताच्या अनैतिक संबंधापायी ही दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.
तपास करणाºया टीमला ‘रिवॉर्ड’; तपासकार्यातील कर्मचारी बक्षिसाने सन्मानित
हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, डॉ.अर्जून भोसले, सिरसाळ्याचे सहा. निरीक्षक साहेबराव राठोड, उपनिरीक्षक जनक पुरी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. याप्रकरणी गोपनीय माहिती काढून तत्परतेने आरोपीस बेड्या ठोकल्याबद्दल पोलीस कर्मचारी रमेश सिरसाट, भास्कर केंद्रे, सचिन सानप, दिलीप गित्ते, विष्णू फड, अर्शद सय्यद यांचे पोलीस अधीक्षकांनी स्वागत करून त्याना ‘रिवॉर्ड’ जाहीर केला आहे.