अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 12:08 PM2023-05-09T12:08:56+5:302023-05-09T12:10:55+5:30

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून मागविण्यात आला आहे.

Low pay, too late; Home Guard reluctant to go to Karnataka for election coverage | अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड):
सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुक सुरू आहे. यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून बोलवण्यात आला आहे. येथील गृह रक्षक दलातील  ( होमगार्ड ) कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. परंतु या होमगार्डंना आधीच अल्प मानधन असते तेही सहा-सहा महिने मिळत नाही. यामुळे स्वखर्चाने निवडणुक बंदोबस्तासाठी जाणे परवडणारे नसल्याने कर्नाटक येथील बंदोबस्ताकडे होमगार्डनी पाठ फिरवली आहे.

येथील गृहरक्षक दलातील कर्मचारी हे मागील ३०-३५ वर्षांपासून सेवेत आहेत. परंतु यांना शासनाकडून कसल्याही प्रकारचे प्रमोशन किंवा त्यांना नोकरीत कायमस्वरूपी करण्यास टाळाटाळ होते. गृहरक्षक दल हे प्रत्येक सणानिमित्त, निवडणुका, कधी आणीबाणीची वेळ आल्यास पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. अनेक वेळा ते १२- १२ तास काम करतात. परंतु त्यांना मिळत असलेले मानधन खूपच तुटपुंज असते. या अल्प मानधनावर होमगार्डचा उदरनिर्वाह होत नाही. तसेच मानधन त्यांना कधीच वेळेवर दिले जात नाही. सहा- सहा महिने वाट पहावी लागते. यामुळे अनेक होमगार्डांवर उपासमारीची वेळ देखील येते.

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून मागविण्यात आला आहे. त्यात विशेष करून गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यामार्फत होमगार्ड यांना निरोप देखील पाठवण्यात आले. परंतु त्यांनी कर्नाटकला जाण्यासाठी असमर्थता दाखवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या होमगार्डने जाण्यास असमर्थता दाखवल्याने पोलिसांची मात्र चांगलीच धावाधाव होताना दिसून येत आहे. पोलिसांना वरिष्ठांच्या आदेशावरून प्रत्येक होमगार्डच्या घरी चकरा मारण्याची वेळ आली आहे.

मानधन-शेतमजुरी सारखीच 
या होमगार्डंना शेतात काम करणाऱ्या मजुरांऐवढीच मजुरी मिळत असल्याने व कर्नाटकमध्ये जाऊन कर्तव्य बजावत असताना खाण्यापिण्याचा खर्च देखील निघू शकणार नाही. यामुळे होमगार्ड कर्नाटकला जाण्यास टाळता करत आहेत.

मानधन मिळते उशिरा 
याबाबत येथील होमगार्ड यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की , कमी मानधन असल्याने आम्हाला इतक्या दूर जाऊन काम करणे अशक्य आहे. आम्ही रात्रंदिवस काम करत असताना आम्हाला सहा सहा महिने मानधन देखील दिले जात नाही यामुळे आम्ही वेगवेगळे कारण दाखवून जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे  नाव न छापण्याच्या अटीवर एका होमगार्डनी सांगितले.

समजावून सांगू 
कर्नाटक निवडणुकीसाठी लागणाऱ्या बंदोबस्तासाठी येथील होमगार्ड यांना पाठवण्याचे आदेश आलेले आहेत. परंतु होमगार्ड यांना निरोप पाठवून व फोन लावून देखील ते कर्नाटकला जाण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु, आम्ही त्यांना समजावून सांगून पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत.
- शितल कुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे

Web Title: Low pay, too late; Home Guard reluctant to go to Karnataka for election coverage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.