ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीने निष्ठावंत नाराज ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:49 PM2024-04-05T19:49:30+5:302024-04-08T19:13:37+5:30
शरद पवारांचा नवा डाव, आता ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे लक्ष
बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील निष्ठावंतांचा विरोध डावलून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे आता काय भूमिका घेणार? त्या अपक्ष लढणार की कोणाचा प्रचार करणार, याबाबत उत्सुकता आहे.
महायुतीकडून अगोदरच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपने यावेळी विद्यमान खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना बाजूला करत पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तगड्या उमेदवाराच्या शोधात महाविकास आघाडी होती. बीडची जागा शरद पवार गटाकडे असल्याने अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनीही पवारांची भेट घेऊन आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. डॉ. मेटे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच गुरुवारी बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर झाल्याने मेटे समर्थकांना धक्का बसला.
सोनवणे सलग दुसऱ्यांदा रिंगणात
बजरंग सोनवणे यांना २०१९ च्या निवडणुकीत खा. शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा सुमारे १ लाख ६८ हजार मतांनी पराभव केला होता. पराभवानंतर सोनवणे सक्रिय नव्हते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनवणे अजित पवार गटात गेले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना गुरुवारी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
आता मेटेंच्या निर्णयाकडे लक्ष
शिवसंग्राम नेत्या डॉ. ज्याेती मेटे या लोकसभा निवडणूक लढणार, असे ठामपणे सांगत आहेत. बुधवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मविआकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आता त्या काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या नावाचा विचार करणार की त्या अपक्ष लढणार, याबाबत उत्सुकता आहे.
निष्ठावंतांच्या नाराजीचे काय?
बजरंग सोनवणे यांना त्यांच्या केज तालुक्यातूनच विरोध आहे. काही दिवसांपूर्वी केज व अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी, असा ठराव केला होता. सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केल्याने येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना अप्रत्यक्ष विरोध केला होता. आता ठराव घेतलेले पदाधिकारी, कार्यकर्ते सोनवणेंचा प्रचार करणार का, याकडेही लक्ष लागले आहे.