कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:48 PM2019-02-12T23:48:07+5:302019-02-12T23:48:43+5:30
तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
बीड : तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उभारलेल्या यंत्रणेचे सोमवारी एका कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ. लक्ष्मण पवार, क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडियाचे अध्यक्ष आदित्य पुंडीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, मॅप्स इंडस्ट्रीजचे एम. डी. अनिरुद्ध तोडकर आदी उपस्थित होते.
गणेश नेवडे यांनी माहिती देत हा उपक्रम राबविल्याबद्दल निवृत कर्नल शशिकांत दळवी व अनिरु द्ध तोडकर तसेच त्यांचे सहकारी गोरख वाघमारे यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले. हा उपक्रम गावातील सर्व बोअरवेलवर हा राबवल्यानंतर गावाची पाण्याच समस्या कायमची दूर होऊ शकते, त्यासाठी आ. पवार यांच्याकडे निधीची मागणी त्यांनी केली.
आ. लक्ष्मण पवार यांनी गावातील टॅँकरच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित कामासाठी निधी देण्याच्या मागणीवर विचार करू असे सांगितले. कामखेडा येथे राज्यातील पहिला उपक्रम सुरु केला. कामखेडा व गेवराई तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी व अनिरुद्ध तोडकर यांनी या भागातील पाण्याचे संकट कायमचे दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्र म इतर गावांमध्ये सुरु करण्यावर आ. पवार यांनी जोर दिला. सततच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी असा उपक्रम राबविलेले बीड जिल्ह्यातील कामखेडा हे राज्यातील पहिले गाव असल्याचे सांगून निवृत्त कर्नल दळवी यांनी या उपयुक्त पध्दतीची माहिती दिली.
कामखेडा होणार टॅँकरमुक्त
कामखेडा येथे जवळपास ६५० इमारती आहेत, ज्यांच्या ५.२६ लाख चौरस फूट छतावरुन जवळपास ३.१५ कोटी लिटर पावसाचे पाणी भूगर्भात सोडून, भूगर्भातील पाण्याची पातळी अशा उपक्रमातून वाढविता येईल तसेच गाव कायमचे टॅँकरमुक्त हाईल, असे कर्नल दळवी म्हणाले.