बीड जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:08+5:302021-03-19T04:33:08+5:30
बीड : महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक कोणतीही ...
बीड : महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी पूर्ण शक्तीने सामोरे जाण्याची माझी सवय आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उदाहरण ठरेल, अशी तयारी महाविकास आघाडीने केली असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यासाठी १८ मार्च रोजी राष्ट्रवादी भवन, बीड येथे आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.
मागील सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या रकमा बँकेत जमा झाल्या. बँकेने पुन्हा कर्ज पुरवठा करताना शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्यावे, असा नियम असूनही जिल्हा बँकेच्या मग्रूर संचालक मंडळाने त्यातही राजकारण करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले, असेही मुंडे म्हणाले.
यावेळी अनुसूचित जाती - जमातीमधून रवींद्र दळवी, इतर मागासवर्गातून कल्याण आखाडे, भटक्या विमुक्त जातीतून सूर्यभान मुंडे, इतर शेती संस्थांतून अमोल दिनकरराव आंधळे, कृषी व पणन संस्थांमधून भाऊसाहेब नाटकर व नागरी बँकांमधून उभे असलेले गंगाधर आगे या उमेदवारांचा उपस्थितांना परिचय करून देण्यात आला.
यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. संजय दौंड, माजी आ. ॲड. उषा दराडे, केशवराव आंधळे, विजयसिंह पंडित, डी. बी. बागल, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, बजरंग सोनवणे, गोविंदराव देशमुख, प्रा. सुशीला मोराळे, सचिन मुळूक, अजय मुंडे आदी उपस्थित होते.
केशवराव आंधळे यांचे पुतणे अमोल आंधळे हेदेखील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार असल्याने आंधळे यांनी चक्क महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली.
मागील संचालक मंडळाने केवळ बँकेचेच नाही तर बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले, असा घणाघात यावेळी केशवराव आंधळे यांनी केला. तसेच महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आ. प्रकाश सोळंके यांनी मतदान प्रक्रिया समजावून सांगितली, तर विजयसिंह पंडित, प्रा. सुशीला मोराळे, सचिन मुळूक, दादासाहेब मुंडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. बजरंग सोनवणे यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.