परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण; धागेदाेरे सापडेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:36 IST2025-01-24T19:36:16+5:302025-01-24T19:36:25+5:30
न्याय द्या, आरोपींना पकडा : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण; धागेदाेरे सापडेनात
परळी : येथील पिग्मी एजंट व प्लॉटिंगची खरेदी - विक्री करणारे महादेव मुंडे यांच्या खुनाच्या घटनेस १४ महिने उलटले आहेत, तरीही याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा व आरोपींना अटक करावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पाेलिसांच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली.
परळी तालुक्यातील भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे हे परळीच्या बँक कॉलनी परिसरात राहायला होते. ते बँकेचे पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला व २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी तहसील कार्यालयाजवळील प्रांगणामध्ये मृतदेह आढळला. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी भेटही दिली होती. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाइकांनी परळी शहर बंद ठेवले होते.
घटनेस १४ महिने उलटले तरी अद्याप याप्रकरणी एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास झाला नसल्याची माहिती आ. सुरेश धस यांनी उघडकीस आणली आहे. त्यानंतर बुधवारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मेव्हणे सतीश फड यांनी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे माध्यमांना सांगितले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा व खून प्रकरणाचा तपास लावावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती परळी शहर पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.