Maharashtra Assembly Election 2019 : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:52 PM2019-09-28T13:52:53+5:302019-09-28T13:54:33+5:30
अवैध शस्त्रसाठा शोध मोहीमेसाठी प्रत्येक ठाण्यात विशेष पथक असणार कार्यरत
बीड : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच राजकीय स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कारवाया सुरु केल्या आहेत. यामध्ये ३ हजार व्यक्तींविरुद्ध विविध स्वरुपाच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर ५ जणांना स्थानबद्ध व १८ गुंडांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व स्वाती भोर यांच्या सूचनेनुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेप्रमुखांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक कालावधीत शांतता व सुव्यस्था अबाधित राहवी यासाठी देखील विशेष पथके देखील नेमली आहेत. यामध्ये विधानसभा निवडणूक शांततेत व्हाव्यात यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या वेगवेगळ्या कलमाखाली या कारवाया केल्या जात आहेत. ज्यांच्यावर निवडणुकीच्या काळातील अशांततेचे,निवडणुकीशी संबंधित तसेच राजकीय गुन्हे दाखल आहेत, किंवा ज्यांच्यापासून सामाजिक शांततेला धोका आहे अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.
बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३२४८ व्यक्तींवर विविध कलमांखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, किंवा ज्यांच्यापासून निवडणुकीच्या काळात धोका निर्माण होऊ शकतो अशा १८ जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांच्या हद्दपारीवर पुढील दोन ते तीन दिवसांत कारवाई होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच ५ व्यक्तींविरुद्ध झोपडपट्टी दादा कायद्याखाली स्थानबद्धतेचे प्रस्ताव दंडाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत.या प्रस्तवांना मान्यता मिळाल्यास निवडणूक कालावधीत शांतता व सुव्यस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुरक्षेच्या दृष्टीने ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक ठाण्यात नेमले पथक
निवडणूक कालावधीमध्ये शांतता व सुव्यस्थेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडून अवैधरित्या शस्त्र बाळगणारे व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.
अशा आहेत प्रतिबंधात्मक कारवाया
कलम स्वरूप संख्या
१०७ चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेणे ९७९
११० सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेणे २४४
१४४ शांतततेला धोका निर्माण करू नये यासाठी नोटीस २७३
१४९ दखलपात्र गुन्ह्यातील प्रतिबंधात्मक कारवाई १५३७
३२४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभा निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव क्रिमिनल रेकॉर्ड तपासून दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून देखील कारवाई केली जात आहे.
- हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक