मोठा धक्का... खुद्द शरद पवारांनी ज्यांना दिली उमेदवारी, त्या नमिता मुंदडा भाजपावासी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:39 PM2019-09-30T12:39:15+5:302019-09-30T12:50:34+5:30
केजमध्ये भाजपा आमदार संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले, नमिता मुंदडा उमेदवार,
- सतीश जोशी
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता अक्षय मुंदडा यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर केलेल्या नमिता मुंदडांना भाजपाची उमेदवारी देऊन किंगमेकर पंकजा मुंंडे यांनी शरद पवार यांना आणखी एक धक्का दिला आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उस्मानाबाद-लातूर आणि बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी रमेश कराड यांना पवारांनी जाहीर केली होती परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी या मतदार संघातून राष्ट्रवादीतून भाजपात घेतलेल्या सुरेश धसांना पंकजा मुंडे यांनी अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला होता. आता विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीबाबत असेच घडले आहे. या मतदारसंघात विद्यमान भाजपा आमदार संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले आहे.
राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीच्या नेत्या स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या चिन्हावर केज विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांसोबत मुंदडा कुटुंबाचे फारसे जमलेच नाही. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढतच गेल्याने मुंदडा कुटुंबिय भाजपात गेले आहे. दिवंगत डॉ विमल मुंदडा यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ सन 1990 साली भाजपा मधून झाला.1990 व 1995 या दोन टर्म त्या भाजपा मधूनच निवडुन आल्या होत्या. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीकडूनही विमल मुंदडा तीन वेळा म्हणजे सलग पाच वेळा निवडून आल्या होत्या.