Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:47 PM2019-09-28T13:47:04+5:302019-09-28T13:50:22+5:30
पहिल्या दिवशी १८४ इच्छूक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले
बीड : जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवापासून सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सहा विधानसभा जागेसाठी एकही अर्ज दाखल झाला नही. मात्र, पहिल्या दिवशी १८४ इच्छूक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले. दरम्यान, माजलगाव विधानसभेत सर्वात जास्त अर्जाची विक्री पहिल्या दिवशी झाली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माजलगाव, परळी विधानसभा क्षेत्रास भेट देऊन पाहणी केली.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात शुक्रवापासून सुरु झाली. विधानसभा क्षेत्रात अर्ज खरेदी सुरु झाली आहे. मात्र, पितृ पंधरवाडा व पहिला दिवस असल्यामुळे एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून उमेदवारी अर्ज खरेदी व भरण्याच्या प्रक्रियेसाठी असलेल्या सर्वच उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातील सर्व हालचालींवर लक्ष राहवे यासाठी कॅमेरे देखील सुरु आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीची चौकशी करुनच कार्यालयामध्ये प्रवेश दिला जात आहे.
माजलगावामध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज खरेदी
पहिल्या दिवशी बीड विधानसभा मतदारसंघासाठी २३ इच्छूक उमेदवारांनी ४८ अर्ज, केज विधानसभा मतदारसंघासाठी ८ जणांनी १९ अर्ज, परळी विधानसभेसाठी १६ जणांनी २२ अर्ज, गेवराई विधानसभेसाठी १३ अर्ज, आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी ८ जणांनी ८ अर्ज खेरदी केले, तर माजलगाव विधानसभेसाठी सर्वात जास्त म्हणजेच ३४ इच्छूकांनी ७४ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. मात्र, पितृ पक्षामुळे एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची संयुक्त पाहणी
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघाचा आढावा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक घेत आहेत. प्रशासकीय तयारी व पोलीस बंदोबस्ताच्या संदर्भात पाहणी व स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संयुक्तपणे माजलगाव व गेवराई विधानसभा मतदारसंघाची पाहणी केली. यावेळी गेवराई निवडणूक अधिकारी प्रकाश आघाव पाटील, माजलगाव निवडणूक निर्णय अधिकारी शोभा ठाकूर यांची उपस्थिती होती. मतदान मोजणी केंद्र, स्ट्राँग रुम, मशीन ठेवण्यासाठी असलेले ठिकाण याची पाहणी केली. त्यासाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी विविध सूचना त्यांनी केल्या. तसेच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या दोन मतदारसंघातील सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी संबंधित पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी महत्त्वाच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया शांतते व निर्भयपणे पार पडेल यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.