आष्टीत चुरशीची लढाई होणार: पवारांच्या तरुण शिलेदाराविरोधात भाजपकडून अनुभवी चेहऱ्याला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:43 PM2024-10-28T16:43:14+5:302024-10-28T17:00:02+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिल्यानंतर भाजपने मात्र अनुभवी नेते असलेल्या धस यांच्यावर विश्वास टाकला आहे.
Ashti Vidhan Sabha ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये यंदा चुरशीची लढाई रंगणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढतीचं चित्र स्पष्ट झालं असून भाजपने आपल्या तिसऱ्या यादीत आष्टीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आष्टीतून भाजपने विधानपरिषदचे आमदार सुरेश धस यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिल्यानंतर भाजपने मात्र अनुभवी नेते असलेल्या धस यांच्यावर विश्वास टाकला आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. तीन बडे नेते उमेदवारीची मागणी करत असल्याने नक्की तिकीट कोणाला द्यायचा, असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांना पडला होता. मात्र अखेर ही जागा भाजपला सुटली आणि आज सुरेश धस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सुरेश धस हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. भाजप, राष्ट्रवादी व पुन्हा भाजप, असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत युद्ध
आष्टी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महेबुब शेख यांना उमेदवारी दिल्यानंतर अन्य इच्छुकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. साहेबराव दरेकरांना उमेदवारी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके यांच्यासह इतरांनी राजीनामा दिला आहे. "मेहबूब शेख या मतदारसंघात निवडून येणार नाहीत. इथं मुस्लिमांची संख्या २०-२२ हजार आहे. साहेबराव दरेकर यांचा विश्वासघात केला आहे. जनतेची भावना दरेकर यांच्यासोबत आहे," अशा भावना दरेकर यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं.