'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:08 PM2024-11-06T17:08:41+5:302024-11-06T17:09:46+5:30
जेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे.
संजय खाकरे, बीड, लोकमत न्यूज नेटवर्क |
Parli Vidhan Sabha ( Marathi News ) : राज्यातील हाय व्होल्टेज सामन्यांपैकी एक सामना बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात रंगत आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी विधानसभा मतदार संघात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी जाणीवपूर्वक मराठा कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सुरुवातीला सोपी वाटणारी ही एकदम चुरशीची बनली आहे. त्यात राजेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे.
२०१४ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे विजयी झाले होते. आता परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची निवडणूक मानली जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी स्वतः धनंजय मुंडे यांनी दोनदा निवडणूक लढविल्याने त्यांना मतदारसंघाची नाडी माहीत आहे. तसेच पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघात गोपीनाथराव मुंडे यांच्या निवडणुकीची यंत्रणाही सांभाळल्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या निवडणुकीत भाजपबरोबर महायुती असल्याने व मनोमिलन झाल्याने धनंजय यांच्यासाठी पंकजा मुंडे या प्रचारात उतरणार आहेत.
परळी शहर व ग्रामीण भागात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे मतदारसंघाच्या बाहेरचे असले तरी परळी मतदारसंघ त्यांना नवा नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांचा परळी मतदारसंघात वावर होता व आजही अनेक गावांत त्यांचा संपर्क आहे. काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, व शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्त्यांचा संपर्क राजेसाहेब देशमुख यांच्या कामाला येणार आहे. शरद पवार यांना मानणारा वर्गही त्यांच्या कामाला येणार आहे. भयमुक्त परळी, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील परळीचे गतवैभव प्राप्त करून देण्याच्या मुद्द्यावर राजेसाहेब देशमुख हे निवडणूक लढवीत आहेत. मराठा, दलित आणि मुस्लिम हा मनोज जरांगे पाटील यांचा 'एमएमडी" फॉर्म्युला लागू पडला तर मुंडे यांना केवळ नशीबच तारू शकते.