Maharashtra Vidhan Sabha Election 2024: "मी आमदार झालो तर तरुणांची लग्न लावून देणार'; उमेदवाराची अजब घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:46 PM2024-11-06T13:46:11+5:302024-11-06T13:51:45+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. कालपासून राज्यभरात प्रचासभांना सुरुवात झाली आहे. परळी विधानसभा मदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काल एका सभेत बोलताना त्यांनी सर्व तरुणांची लग्न लावून देण्याबाबत आश्वासन दिले. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
काल परळी येथील सभेत बोलताना देशमुख यांनी आश्वासने देत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. राजेसाहेब देशमुख म्हणाले, तरुणांना पाहुणा म्हणून या गावात येत असताना लोक विचारतात पोराला नोकरी आहे का? आता सरकारच देत नाहीतर कुठून लागणार. पुन्हा लोक विचारतात काही उद्योगधंदा करताय का? आता पालकमंत्र्यांचाच उद्योग काही चालेना मग तुमचा काय चालणार आहे, त्यांनी एकही उद्योग उभा केला नाही असं असेल तर एकाही मुलाच लग्न होणं अवघड आहे. पण सर्व तरुणांना मी आश्वासन देतो जर मी आमदार झालो तर सगळ्यांचं लग्न करु, सगळ्यांना कामधंदा देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले.
तरुणांची काम करणार आहे. गेल्या सात वर्षापासून या भागात लोडशेडिंग आहे. त्यावर काम करायचे आहे, असंही देशमुख म्हणाले. यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी धनजंय मुंडे यांच्यावर टीकाही केली.
धनंजय मुंडे- राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत
परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 58 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दहा उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये अवैध ठरले होते. 48 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये वैध ठरले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. यापूर्वी दोघाजणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता 11 उमेदवार राहिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड, अपक्ष उमेदवार राजेश देशमुख व प्रभाकर वाघमोडे, दिलीप बिडगर यांच्यासह एकूण 37 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे धनंजय पंडितराव मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख या दोघांमध्ये सरळ लढत होईल.
धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट , राजेसाहेब श्रीकिशन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, डी एल उजगरे बहुजन समाज पार्टी, केदारनाथ जाधव पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया. भागवत वैद्य विकास इंडिया पार्टी , साहस आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा, अल्ताफ खाजा मिया सय्यद अपक्ष ,दयानंद लांडगे अपक्ष, राजेसाहेब सुभाषराव देशमुख अपक्ष ,शाखेर अहमद शेख अपक्ष, हिदायत सादिक अली सय्यद अपक्ष यांचा समावेश आहे.