संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:28 AM2024-11-10T06:28:44+5:302024-11-10T06:29:09+5:30
Sharad Pawar: परळी, बीड व आष्टी येथे शनिवारी पवार यांच्या जाहीर सभा झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : संकटकाळात ज्यांना मदत केली, नेतृत्व निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षनेता केले, मंत्रिमंडळात घेतले त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेत बीड जिल्ह्याच्या ऐक्याचा व पुरोगामित्वाचा आदर्श उद्ध्वस्त केला, अशा व्यक्तींना सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
परळी, बीड व आष्टी येथे शनिवारी पवार यांच्या जाहीर सभा झाल्या. ते म्हणाले, मुंबईत पंडितअण्णा व धनंजय आले होते. ‘हा माझा मुलगा, त्याच्यावर लक्ष ठेवा,’ म्हणत पंडित अण्णांनी अडचणीत मदत मागितली. त्यानंतर पक्षात घेत संधी दिली. लाेकांची सेवा करता यावी म्हणून संघटनेत जबाबदारी दिली. विधान परिषदेत, मंत्रिमंडळात सहकार्य केले. जे, जे करता येईल ते, ते मी केले.