Maharashtra Bandh : अंबाजोगाईत बैलगाडया रस्त्यावर; २१ तरुणांचे मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:48 PM2018-08-09T15:48:47+5:302018-08-09T15:53:36+5:30
आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या.
अंबाजोगाई (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज क्रांतीदिनी ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या.
या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. तर बसवाहतूक दिवसभर बंद राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तर शहरातील बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली. तर २१ तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तालुक्यातही ठिकठिकाणी आंदोलन
अंबाजोगाई तालुक्यातही मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. यात घाटनांदूर, बर्दापूर, पूस, अंबासाखर, वाघाळा, पिंपळा, लोखंडीसावरगाव, मोरेवाडी अशा अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. ग्रामीण भागातूनही मराठा बांधव विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.