Maharashtra Election 2019 : बैठकीत चहापानासाठी वापरला प्लास्टिकचा 'कप'; जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनालाच ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:39 PM2019-10-08T17:39:08+5:302019-10-08T17:41:59+5:30
बंदी असताना प्लास्टिक आवरणाच्या कपात चहा
बीड : चहापानासाठी वापरण्यात आलेल्या कपाला प्लास्टिकचे आवरण असल्याचे काही जणांनी निदर्शनास आणून देताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनालाच सोमवारी पाच हजारांचा दंड ठोठावला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चहापान ठेवण्यात आले होते. यावेळी प्लास्टिकचे आवरण असलेल्या कपामध्ये चहा देण्यात आला. काही जणांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तात्काळ पाण्डेय यांनी या पत्रकार परिषदेचे नियोजन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. तसेच पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टिक वापरावर बंदी असताना त्याचा वापर केल्याने पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावत असल्याचे जाहीर केले.
सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश
हा दंड ठोठावण्यामागचा उद्देश हा नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देणे असून, प्रशासकीय बैठकांमध्ये प्लास्टिकचा वापर होणार नाही. तसेच अनेक जण प्लास्टिकचे बुके घेऊन भेटीसाठी येतात. त्यांनीही बुके आणणे टाळावे. नागरिकांनी पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले.