Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 05:47 PM2019-10-03T17:47:27+5:302019-10-03T17:48:23+5:30
अर्ज दाखल केल्यानंतर विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली.
परळी : परळी विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष,व महायुतीच्या उमेदवार राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांचे यशश्री निवासस्थानी त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले. यावेळी पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, गौरव खाडे व कुटूंबिय उपस्थित होते. ना. पंकजाताई मुंडे यांनी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारी १२.०५ वा. त्यांनी उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी दाखल करायला जातांना मंत्री महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नेताजी देशमुख, डाॅ. स्वरूपसिंह हजारी आदी य उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली.