Maharashtra Election 2019: भगवान गडावर घुमला राष्ट्रभक्तीचा नारा; महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:39 PM2019-10-08T14:39:18+5:302019-10-08T14:40:32+5:30
तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते.
परळी - आपल्या सर्व जणांना एकत्र करण्याची शक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती, देशाच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणारे अमित शहांनी 370 कलम हटवून न्याय दिला त्यामुळे त्यांना 370 ध्वजांची सलामी देण्यात आली. भक्तांची गर्दी भविष्याची दिशा बदलेल, मतांसोबत मनंही जिंकायचं आहे, अशा शब्दात दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शहांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे.गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केलं ते पुढे सुरु ठेवायचं आहे. माझ्या भावांना कोयता उचलण्याची वेळ येऊ नये असं कार्य करायचं आहे. आज माझ्या संघर्षाने मला तुम्ही कौतुकाची थाप दिली. शेवटपर्यंत तुमचा स्वाभिमान अन् सन्मानासाठी काम करायचं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. 4 वर्षापूर्वी अहंकराचा गड उतरून नवी सुरुवात केली. तुमच्या उपस्थितीतने मला शाबासकी मिळाली आहे, नेतृत्वाची शाबासकी मिळणं हे मोठं भाग्य आहे. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी काम केलं. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केलं असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यावेळी अमित शहांनी कलम 370 हटविण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. कलम 370 हटवून संपूर्ण देशाला एक केलं. तुम्ही 300 जागा दिल्या मोदींनी 370 कलम हटवलं. 70 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या गोष्टी मोदींनी पूर्ण केल्या. मोदींनी ओबीसीसाठी आयोगाची स्थापना केली. कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाषणात सांगितले. भगवानबाबांनी लोकांसाठी आयुष्य वेचलं. शिक्षणाचा विचार लोकांमध्ये रुजावलं. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. मोदींचे कार्य घराघरापर्यंत पोहचवा असं आवाहनही यावेळी अमित शहांनी केलं. यावेळी मंचावर भाजपाचे बीड आणि परिसरातील सर्व उमेदवार उपस्थित होते.