Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 03:41 PM2019-10-05T15:41:37+5:302019-10-05T15:44:04+5:30

दोन-तीन दिवसांत बंडखोरांची मनधरणी करण्यात उमेदवारांचा वेळ खर्ची होणार आहे. 

Maharashtra Election 2019: Rebellion in Beed district also for vidhansabha | Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी 

Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी 

Next
ठळक मुद्देसहा विधानसभा मतदारसंघात मिळून २३२ उमेदवार रिंगणात

- सतीश जोशी 

बीड : बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, गेवराई, बीड मतदारसंघांत बंडखोरीची लागण झाली. कुठे महायुतीचा धर्म तोडला, तर कुठे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ७ आॅक्टोबर शेवटची तारीख असून, मध्यंतरीच्या या दोन-तीन दिवसांत बंडखोरांची मनधरणी करण्यात उमेदवारांचा वेळ खर्ची होणार आहे. 

सहा विधानसभा मतदारसंघात मिळून २३२ उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यांनी  ३१७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. जिल्ह्यात सहाच्या सहा जागाही राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीतर्फे संदीप क्षीरसागर, एमआयएमतर्फे शेख शफिकभाऊ, वंचित बहुजन आघाडीतर्फे अशोक हिंगे, भाजपचे बंडखोर राजेंद्र मस्के यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आष्टीत शेवटच्या दिवशी भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब आजबे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. आष्टीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे अधिकृत उमेदवार असतानाही या ठिकाणी माजी आमदार साहेबराव दरेकर, आ. सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे धोंडे यांची डोकेदुखी वाढली आहे.  

गेवराईत भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, राष्ट्रवादीकडून बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, शिवसेनेचे माजी आमदार बदामराव पंडित, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू देवकते यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सध्या तरी या ठिकाणी चौरंगी लढतीची शक्यता आहे. माजलगाव मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे मोहन जगताप यांनी भाजपचेच उमेदवार रमेश आडसकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे.

परळी येथे पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जगतापांच्या हस्ते पक्षाचा ए-बी फॉर्म आडसकरांना दिल्यामुळे आणि शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना आडसकरांसोबत सहभागी झाल्यामुळे जगतापांचे बंड हे थंड झाल्याचे दिसत आहे. या ठिकाणी माजी मंत्री प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत. केजमध्ये शेवटच्या क्षणी विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचे तिकीट कापत राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना भाजपने उमेदवारी दिली.  राष्ट्रवादीतर्फे या ठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठे  यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.  

परळीकडे लक्ष 
परळीत बहुजन वंचित आघाडीतर्फे भीमराव सातपुते रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या  विद्यमान आमदार पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात कडवी झुंज होत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Rebellion in Beed district also for vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.