महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:11 PM2019-10-21T15:11:45+5:302019-10-21T15:16:37+5:30
ज्यांनी वाईट केलं, सहानभुती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेलं आहे
परळी - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. अशातच राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीमध्ये संघर्षाची लढाई आहे. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून परळीत घड्याळाचा गजर सुरु आहे. निकालाच्या दिवशीही तेच दिसणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरु होणार आहे. मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. ज्यांनी वाईट केलं, सहानुभूती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेलं आहे. २४ तारखेला निकालातून पराजय कोणाचं होईल हे स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच चित्रा वाघ यांनी माझ्याबद्दल जी प्रतिक्रिया दिली आहे त्याचं नवल नाही, चित्रा वाघ या भाजपात आहेत स्वाभाविक त्यांना ती प्रतिक्रिया देणं भाग आहे. वैयक्तिक चित्राताईंना विचारा धनंजय मुंडे काय आहेत असा टोला भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरुन खासदार प्रितम मुंडेंनी खेद निराशा व्यक्त केली होती. आम्ही खिन्न झालो आहोत, आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलंय. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात, आता धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही, असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांनाही भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीनाथ मुंडे असते तर, असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असे म्हणत प्रितम मुंडेंनी धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक दु:खे आली, पण खंबीरपणे पंकजाताई सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही, काहीही केले तरी त्या खचत नाहीत हीच त्यांची पोटदुखी आहे. एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या आहेत. यापूर्वी मी त्यांना एवढे उद्विग्न झाल्याचे कधीही पाहिलेलं नाही, असेही प्रितम मुंडेंनी म्हटलंय.
तर मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे'', असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होते.