'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 06:31 PM2020-12-13T18:31:15+5:302020-12-13T18:31:35+5:30
याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते.
परळी : हिंदी चित्रपट सृष्टी उभी करण्यात महाराष्ट्राचेच सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगत परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते परळीत सपत्नीक आलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा! अभिनेते गोविंदा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. यावेळी बोलताना मुंबईतील बॉलिवूड उभारण्यात शरद पवार यांचं योगदान असल्याचं ते म्हणाले. बॉलीवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे सांगितले.
'पूर्वी १९९९ साली गोविंदाजी परळीत आले तेव्हा म्हणाले होते की धनंजय मुंडे हा माणूस मोठा होईल!' प्रभू वैद्यनाथाचे व परळीतील जनतेचे आशीर्वाद घेऊन आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते काम करत आहेत, यावर गोविंदा यांनी 'परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो, असे गौरवोद्गार काढले. 'धनंजय मुंडेजी ने जो सेवा सामान्य लोगो की की है, वह देखकर उपरवाला उनके साथ है, धनंजय मुंडे जैसे नेता असली जिंदगी के हिरो है' या शब्दात गोविंदा यांनी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
पत्नी सुनीता आहुजा यांच्यासह दुसऱ्यांदा परळीत आलेल्या अभिनेता गोविंदा यांनी २१ वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्याला परळीला आणले होते, आज पुन्हा २१ वर्षांनी परळीत आलो, इथल्या लोकांचे धनंजय मुंडे यांच्यावरील प्रेम पाहून धनंजय मुंडे यांचे व्यक्तिमत्त्व आणखी मोठे होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जि. प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ. पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख, वाल्मिक अण्णा कराड, सोमनाथ आप्पा हालगे, बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, शिवाजी सिरसाट, चंदूलाल बियाणी, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, प.स. सभापती सौ. उर्मिलाताई गित्ते, संगीता ताई तुपसागर, अर्चनाताई रोडे, पल्लवी भोईटे, यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते.