महाराष्ट्राचे शक्तीपीठ योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:42 PM2022-09-26T15:42:48+5:302022-09-26T15:42:48+5:30
सलग दोन वर्षानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यावर्षी खुल्या वातावरण नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांची ही गर्दी वाढू लागली आहे.
अंबाजोगाई ( बीड) : महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. सलग दोन वर्षानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यावर्षी खुल्या वातावरण नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांची ही गर्दी वाढू लागली आहे.
२६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. या महापुजेसाठी योगेश्वरी देवीचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, भगवानराव शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी, यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते.
यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. महाआरती नंतर भाविकांची योगेश्वरी च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज दुपारी मंदिर परिसरात देवळा हनुमान महिला भजनी मंडळ, रेणुकाचार्य महिला भजनी मंडळ, आर्यवैश्य महिला भजनी मंडळ, जागृत महिला भजनी मंडळ यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम सादर झाला. तर रात्री मुकुंदराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प किसनमहाराज पवार यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना मुकुंदराज भजनी मंडळाचे सदस्य साथसंगत देतील. नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी केले आहे.