महर्षी कणाद शाळेच्या कारकुनास निलंबित करून प्रशासक नेमावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:59+5:302021-06-19T04:22:59+5:30
परळी : येथील महर्षी कणाद शाळेचे कारकून व मुख्याध्यापिकेला पदावरून निलंबित करून शाळेवर प्रशासक नेमावा अशी मागणी मराठवाडा ...
परळी : येथील महर्षी कणाद शाळेचे कारकून व मुख्याध्यापिकेला पदावरून निलंबित करून शाळेवर प्रशासक नेमावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस.घाडगेंसह इतर शिक्षक संघटनांनी केली आहे. महर्षी कणाद शाळेतील इतर तीन शिक्षकांनासुध्दा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शाळेतील इतर शिक्षक दहशतीखाली वावरत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.
शहरातील महर्षी कणाद विद्यालयातील सहकारी शिक्षक सतीश जाधव यांना त्याच शाळेतील स्वत: संस्थाचालक म्हणून घेणारे लिपिक केशव भांगे याने तिसरी वर्गाची हजेरी लिहिली नाही म्हणून अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना अतिशय निंदनीय व शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. जाधव यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी व जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या या प्रकाराबद्दल कडक कारवाई करून शिक्षकांना संरक्षण द्यावे. तसेच संबंधित कारकून आणि सेवाज्येष्ठता डावलून मुख्याध्यापक केलेल्यास बडतर्फ करून शाळेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना , मुख्याध्यापक संघटना, जुक्टा संघटना, विद्यार्थी सेना यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, बंडू अघाव, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अजय जोशी, बी. टी. हंगरगे, दत्ता शिंदे, शारीरिक शिक्षक संघटना व विद्यार्थी सेनेचे अतुल दुबे, जुक्टाचे सुनील चव्हाण, मुख्याध्यापक संघटनेचे बळवंत चव्हाण आदींची नावे आहेत.