Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 02:06 PM2022-03-01T14:06:59+5:302022-03-01T14:06:59+5:30

Mahashivratri: श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते.

Mahashivratri: In the chanting of Har Har Mahadev, devotees of Shiva come to Vaidyanath temple for darshan | Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ

Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ

googlenewsNext

परळी( बीड ) : हर हर महादेवचा जयघोष करीत भाविकांनी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून सुरू झाले आहे. श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते.

रात्री 12 नंतर मंदिरात भाविकांनी प्रवेश करत महाशिवरात्रीचे दर्शन घेणे सुरू केले. सोमवारी रात्री नऊ वाजता छबिना भजन व  आरती  झाली .त्यानंतर रात्री बाराच्या नंतर महाशिवरात्रीचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणे सुरू झाले. प्रारंभी मंदिर पुजारी यांनी श्री वैजनाथाची पूजा केली त्यानंतर दर्शन सुरू झाले. महाशिवरात्री निमित्त मंदिरात सनई चौघडाची सुविधा करण्यात आली. तसेच वैजनाथ मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यनाथ मंदिरात सुरक्षेच्यादृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रात्री मंदिर परिसराची तपासणी केली यावेळी सोबत मार्शल डॉग होता.

वैजनाथ देवस्थान ट्रस्टची जोरदार तयारी 
महाशिवरात्र उत्सवाची श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने जोरदार तयारी केली आहे. महाशिवरात्रीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने ट्रस्टच्यावतीने महिला, पुरुष व धर्मदर्शन अशा तीन रांगा लावण्यात येणार आहेत. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून मंदिराच्या पायऱ्यावर बॅरिकेट उभारले आहेत. महाशिवरात्रीच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग 
भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी केवळ परळीतच भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग आहे.                   पुरातन काळात देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्या मंथनातून चौदा रत्ने निघाली. त्यात वैद्यांचा राजा धन्वंतरी व अमृत ही दोन रत्ने होती. ही दोन रत्ने दानवांच्या हाती लागू नयेत म्हणून भगवान श्रीविष्णूने अमृतासह धन्वंतरीला परळीच्या ज्योतिर्लिंगात लपवून ठेवले. दानवांना हे समजताच ते अमृत घेण्यासाठी धावले, परंतु त्यांचा त्या शिवलिंगाला स्पर्श होताच त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. ते पाहून राक्षस पळून गेले. मात्र, शिवभक्तांनी जेव्हा या शिवलिंगाला स्पर्श केला. तेव्हा त्यातून अमृतधारा निघाल्या. तेव्हापासून या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून भक्त दर्शन घेतात, अशी आख्यायिका आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम
शिवक्षेत्र असल्याने महाशिवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय वर्षप्रतिपदा, श्रावणमास, विजयादशमी, वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी होते. गुढीपाडव्याला वैजनाथ मंदिरात गुढी उभारण्याचा समारंभ मोठ्या थाटामाटात केला जातो. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक, मंत्रजप चालतात. मंदिराच्या परिसरात कालरात्री देवी मंदिर, अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई, दक्षिणमुखी गणपती मंदिर, श्री संत जगमित्र नागा मंदिर, गोराराम, सावळाराम, काळाराम मंदिर व इतर अनेक मंदिरे येथे आहेत.

Web Title: Mahashivratri: In the chanting of Har Har Mahadev, devotees of Shiva come to Vaidyanath temple for darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.