मराठवाडा वाॅटर ग्रीड प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सकारात्मक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:02 AM2021-02-21T05:02:07+5:302021-02-21T05:02:07+5:30
परळी : भाजप सरकारच्या काळातील महत्त्वपूर्ण असलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असल्याचा दावा राज्याचे ...
परळी : भाजप सरकारच्या काळातील महत्त्वपूर्ण असलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असल्याचा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
परळी तालुक्यातील टोकवाडी येथे शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. परभणी जिल्ह्यातील माजी आमदार विजय गव्हाणे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडला देण्यात आलेली स्थगिती उठविण्याची मागणी केली. यावर बोलताना मुंडे यांनी, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असल्याचा दावा केला. या योजनेमुळे मराठवाड्याची तहान भागणार आहे. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके, आ. संजय दौंड, माजी आमदार विजय गव्हाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, ॲड. विष्णुपंत सोळंके, नागोराव देशमुख, डॉ. सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.
चौकट,
गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार धनंजय मुंडे
गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राहिलेले माजी आमदार विजय गव्हाणे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हेच असल्याचे यावेळी बाेलताना सांगितले. या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. याच कार्यक्रमात आ. दौंड यांनी यावर टिप्पणी करताना धनंजय मुंडे हे वारसदार होते हे विजय गव्हाणे यांना कळाले होते, पण गोपीनाथ मुंडे यांना कळाले नव्हते, असे सांगितले. त्यावर धनंजय मुंडे यांनी देव करतो तो भल्यासाठीच करतो असे म्हणून एका राजाची गोष्ट सांगून त्यावर उत्तर दिले.