माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:01 PM2019-10-22T18:01:26+5:302019-10-22T18:04:33+5:30
बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत
माजलगाव (बीड ) : मागील पधरवाड्यात झालेला दमदार पाऊस तसेच धरण परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी १२ टक्के झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
अनेक वेळा परतीच्या पावसाने मृत साठयात असलेले हे धरण पूर्ण भरले आहे. मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ पहावयास मिळाली. ७ ऑक्टोबर रोजी हे धरण मृत साठयातुन बाहेर पडले. यावेळी या धरणात ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा झाला होता. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५६ मीटर पाणी पातळी होती व एकूण पाणीसाठा हा १५८ दलघमी एवढा होता तर ५.२६ टक्के एवठा पाणी साठा उपलब्ध होता. २४ तासात पाणी पातळीत वाढ होऊन ती ४२७.१० मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा १८० दलघमी झाला. यामुळे टक्केवारीत वाढ होऊन १२.१८ झाली आहे. परतीच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपला तेव्हा धरणात एकूण १२६.१० दलघमी पाणी साठा होता. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.