माजलगाव धरण साठ्यात १२ तासांत दीड मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:04+5:302021-09-06T04:38:04+5:30
माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू ...
माजलगाव : माजलगाव धरणाच्या वरील भागातील गावांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात रविवारी पहाटेपासून मोठी आवक सुरू आहे. १२ तासात दीड मीटर पाणी धरणात आले.
आता या धरणातून केव्हाही पाणी सोडण्यात येऊ शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरणात १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणात २-३ टक्के पाणीसाठा वाढला होता. ३१ ऑगस्ट रोजी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी ३५ टक्क्यांपर्यंत गेली होती. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे शिरूर, आष्टी, पाटोदा आदी भागांत जोरदार पाऊस झाल्याने सिंदफणा नदीतून धरणात रविवारी सकाळी पाण्याची ८२ हजार क्युसेकने मोठी आवक सुरू झाली होती.
शनिवारी रात्री धरणात ६० टक्के पाणी उपलब्ध होते. त्यात रात्रीतून वाढ होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ९० टक्के पाणी झाले होते. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढी पाणी पातळी आवश्यक आहे. धरणात ४३१.३७ मीटरइतके पाणी आले. धरणात सध्या ४२०.९० दलघमी एकूण पाणीसाठा असून २७८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण रात्री उशिरापर्यंत भरण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती धरणाचे अभियंता बी. आर. शेख यांनी दिली.
पाणीप्रश्न सुटणार
मागील बारा तासांत या धरणात जवळपास दीड मीटर पाणी आले, तर तीस टक्के पाणीसाठा वाढला होता. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. हे धरण भरत आल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक खेड्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
सतर्कतेचा इशारा
माजलगाव धरण आता केव्हाही भरू शकते. यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना लेखी व दौंडी द्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही व्यक्ती व जनावरांसह थांबू नये असा इशारा येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.
050921\purusttam karva_img-20210831-wa0029_14.jpg