माजलगाव आगाराला दोन महिन्यांत अडीच कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:44+5:302021-05-13T04:33:44+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून दोन महिन्यांत पूर्णपणे बस बंद असल्याने आगाराचे जवळपास अडीच कोटी ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून दोन महिन्यांत पूर्णपणे बस बंद असल्याने आगाराचे जवळपास अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने मालवाहतूक बसेसही बंद आहेत. दोन महिन्यांत अडच कोटींचे उत्पन्न बुडाले असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र वाऱ्यावर न सोडता वेतन अदा केल्याचे सांगण्यात आले.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये माजलगाव आगारास मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या आगाराला पहिल्या लॉकडाऊननंतर ७-८ महिने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. त्याआधी या आगाराचे दररोजचे उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त होते; तर सिजनमध्ये हे उत्पन्न ८ लाखांपर्यंत जात होते. डिसेंबर २०२० नंतर तीन महिने या आगाराला पाच-साडेपाच लाख रुपये मिळू लागले. यामुळे या आगाराची गाडी रूळावर येत आहे, असे वाटत असताना मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने प्रवाशांची संख्यादेखील रोडावली. मार्चमध्ये या आगाराला केवळ साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकले. २७ मार्चनंतर या आगारातून जाणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या.
मार्च महिन्यातील शेवटचे चार दिवस, एप्रिलचा संपूर्ण महिना व मेच्या १२ तारखेपर्यंत या आगाराचे जवळपास २ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. या आगारातून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एखाद्या ठिकाणी कोणाला जायचे असेल, तर यासाठी २० प्रवासी मर्यादेची अट घालण्यात आली होती. दोन महिन्यांच्या काळात एकही अत्यावश्यक सेवेसाठी बस या आगारातून गेली नाही.
मागील दीड -दोन महिन्याच्या काळात लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने व या आगारास चांगले उत्पन्न मिळवून दिलेल्या माल वाहतूक बसही एकदम बंदच आहेत. यामुळे या आगाराला मागील दोन महिन्यांत एक रुपयाचेही उत्पन्न मिळू शकलेले नाही. तरीही या आगारातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतनदेखील देण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
सुरळीतपणा यायला वेळ लागणार
माजलगाव आगाराला डिसेंबर ते मार्चपर्यंत चांगले उत्पन्न मिळणे सुरू झाले होते; परंतु २७ मार्चनंतर म्हणजे मागील दोन महिन्यात एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळू शकले नाही. यापुढे बस सुरू झाल्या तरी प्रवाशांअभावी स्थिती लवकर सुरळीत होणे शक्य नाही.
- दत्तात्रय काळम-पाटील, आगारप्रमुख