माजलगाव आगाराची सात शहरांवर मदार , दररोज दोन लाखांचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:02 AM2021-02-18T05:02:51+5:302021-02-18T05:02:51+5:30
पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ ...
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ झाली असलीतरी केवळ सात शहरांवर आगाराची मदार असुन ग्रामीण भागातील बसमध्ये केवळ विद्यार्थीच प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपये तोटयात चालले आहे.
माजलगाव आगाराचे कोरोनापुर्वी उत्पन्न चांगले होते. लॉकडाऊननंतर या आगारातू केवळ शहरी भागात बस सुरू करण्यात आल्या.सुरूवातीला या बस सुध्दा रिकाम्या धावत होत्या त्यानंतर थोड्या फार प्रमाणात प्रवाशी वाढु लागले.या आगारातुन मोठ्या प्रमाणावर लांब पल्याच्या बस सुरू असुन यात कोल्हापुर , नांदेड ,मुंबई ,लातुर ,सोलापुर ,मेहकर व बुलढाणा या सात ठिकाणी जाणाऱ्या बसचे उत्पन्न आगाराच्या ६५-७० टक्के ऐवढे आहे. यामुळे या आगाराची वरील सात गावांवर मदार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. येथुन जाणाऱ्या बस पुर्वी २० हजार कि.मी.चालत असत. परंतु आता केवळ १७ हजार कि.मी.महिन्याला चालु आहेत.
या आगाराचा सध्या दररोजचा खर्च ६ लाख ५० हजार रूपये होत असून उत्पन्न केवळ ४ लाख ५० हजार मिळत असुन या उत्पन्नापैकी ३ लाख रुपये उत्पन्न वरील सात शहरांवर मिळते. यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपयांनी तोटयात चालले आहे.सध्या या आगारातुन चालणाऱ्या निमआराम ,शिवशाही , स्लीपर कोच या बस मोठ्या प्रमाणावर तोटयात दिसून येत आहेत तर रातराणी बस फायदयात चालत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.
माजलगाव आगारातून जवळपास ९० टक्के ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी या बसकडे प्रवाशी पाठ फिरवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या बस मध्ये केवळ विदयार्थीच येत आहेत. सध्या या आगारातून एक हजार विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आल्या असल्यातरी आनखी तीन हजार विद्यार्थी पासपासून दुर आहेत.
या आगारातुन केवळ लातुरला प्रत्येक तासाला बस जात आहेत. सकाळी सहा वाजल्यांपासुन दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला लातुरला जाण्यासाठी बस उपलब्ध असून येण्यासाठी १० वाजेपासुन ५ वाजेपर्यंत बस सुरू आहेत.लातुरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी जास्त फे-या चालु असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळमपाटील यांनी दिली.