माजलगावात प्रशासनानेच घेतले कोंडून, तर बीडीओ प्लास्टिकबंद केबिनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:11+5:302021-05-05T04:55:11+5:30

पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथील तहसील कार्यालयात स्वतः तहसीलदार वैशाली पाटील या मुख्य द्वाराला बाहेरून कुलूप लावून आत बसत ...

In Majalgaon, it was taken by the administration, while in BDO plastic closed cabin | माजलगावात प्रशासनानेच घेतले कोंडून, तर बीडीओ प्लास्टिकबंद केबिनमध्ये

माजलगावात प्रशासनानेच घेतले कोंडून, तर बीडीओ प्लास्टिकबंद केबिनमध्ये

Next

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : येथील तहसील कार्यालयात स्वतः तहसीलदार वैशाली पाटील या मुख्य द्वाराला बाहेरून कुलूप लावून आत बसत असल्याचा अजब प्रकार सुरू आहे. दुसरीकडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीही आपल्या कार्यालयात स्वतःला प्लास्टिक मेणकापडाची केबिन करून आत कोंडून घेतले आहे. नगर परिषदेचे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये सतत रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी मात्र ठराविक ठिकाण सोडले तर रस्त्यावर हिरीरीने उतरलेले दिसत नसल्याचे चित्र आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी देखील एकदाही रस्त्यावर दिसून आले नाहीत, त्यामुळे अशा प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतःला अलिप्त केल्याने जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दीड महिन्यांपूर्वी कोरोनाचा फैलाव वाढल्याने तो रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर तहसीलदारांना जबाबदारी देण्यात आली. सध्या लॉकडाऊन निर्णयाची अंमलबजावणी, सर्व खात्यात समन्वय आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या झालेल्या तुटवड्यावर नियंत्रण ठेवूून योग्य रुग्णांना नोंदणीप्रमाणे वाटप करणे हे महत्त्वाचे काम आहे. मात्र, तहसीलदारांनी मंगळवारी तहसील कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतले. शिपायास सांगून मुख्य प्रवेशद्वारास बाहेरून कुलूप लावून घेतले. दाराबाहेर रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन नोंदणीसाठी तिष्ठत बसले, तर इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांसाठी मात्र मुख्य दार उघडण्यातच आले नाही. त्यामुळे लोकांचा खोळंबा झाला. हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दुसरीकडे गटविकास अधिकारी प्रज्ञा माने याही आपल्या कार्यालयात केलेल्या प्लास्टिक कर्टनच्या केबिनमधून प्रश्न सोडवत आहेत. मात्र, त्या देखील कधी ग्रामीण भागात रस्त्यावर उतरून काम केल्याचे दिसून आलेले नाही. नगर परिषदेच्या बाबतीत त्यांचे कर्मचारी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पडण्यासाठी झटत असताना मुख्याधिकारी विशाल भोसले मात्र ठराविक ठिकाण वगळता रस्त्यावर नाहीत. ते कुठे असतात यावर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील हे देखील रस्त्यावरून गायब आहेत. केवळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे हे आपल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग, वाहन तपासणी करून शहराचा भार उचलत असल्याचे दिसून येत आहे.

लोक विनाकारण येऊन गर्दी करत असल्याने आम्ही कुलूप लावले आहे, रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था आम्ही व्यवस्थित केली आहे.

- वैशाली पाटील, तहसीलदार.

===Photopath===

040521\img_20210504_121634_14.jpg~040521\purusttam karva_img-20210504-wa0031_14.jpg

Web Title: In Majalgaon, it was taken by the administration, while in BDO plastic closed cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.