कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर माजलगाव नगर परिषद मोफत अंत्यसंस्कार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:11+5:302021-05-11T04:36:11+5:30
माजलगाव : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एक रुपयाही कुणाला देऊ नये. या मृत्यू झालेल्या व्यक्तीवर आपल्या जाती धर्माच्या ...
माजलगाव
: कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एक रुपयाही कुणाला देऊ नये. या मृत्यू झालेल्या व्यक्तीवर आपल्या जाती धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे माजलगाव नगर परिषद मोफत अंत्यसंस्कार करणार असल्याचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सांगितले आहे.
कोविड १९ या विषाणूने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाला रोखण्यासाठी नगर परिषदेचे, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सर्व कर्मचारी हे आपला जीव मुठीत धरून काम करत आहेत.
तरीदेखील कोरोनाची दुसरी लाट ही वेगाने वाढत आहे.
कोरोना झालेल्या रुग्णांवर डॉक्टर आपली शक्ती पणाला लावून उपचार करत आहेत. परंतु तरी देखील काही रुग्णांचे कोरोनाने मृत्यू होऊ लागले आहेत. या मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांकडून जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्याने आता ९ मे २०२१ पासून कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातून अंत्यविधीला आणण्यासाठी लागणाऱ्या वाहनाचा खर्चदेखील नगर परिषद करणार आहे. आपल्या जाती, धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे माजलगाव नगर परिषदेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करणार असल्याचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सांगितले.
कोणत्याही कर्मचाऱ्यांनी एक रुपयाही घेतल्याची तक्रार आली, तर तात्काळ कार्यवाही करणार आणि अशा दु:खात असलेल्या लोकांकडून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी एक रुपयाही घेऊ नये. जर तशी तक्रार आली, तर त्या कर्मचाऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
नगराध्यक्ष, शेख मंजूर.