दीड कोटींच्या अपहार प्रकरणी माजलगावचे नगराध्यक्ष चाऊस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 07:07 PM2020-03-04T19:07:54+5:302020-03-04T19:18:54+5:30
कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी
माजलगाव : येथील नगर परिषदेमध्ये झालेल्या दीड कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बुधवारी ( दि. ४ ) नगर परिषद कार्यालयातून गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच या प्रकरणातील फरार मुख्याधिकारी व लेखापाल यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये तीन मुख्याधिकारी, लेखापाल व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून यातील आरोपी हे फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास होता परंतु मागील दोन महिन्यांपासून यातील आरोपी सापडत नव्हते. मात्र, यातील एक मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांनी बीड येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान माजलगाव नगर परिषद कार्यालायातून नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना ताब्यात घेतले. दरम्यान लेखापाल अशोक कुलकर्णी (वांगीकर) यांनीही आत्मसमर्पण केले. तिघांनाही दुपारी ४ वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए. वाघमारे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, सहाल चाऊस यांना अटक झाल्यानंतर येथील शहर पोलीस ठाण्यात तसेच न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.