माजलगावातील शेजूळ हल्ला प्रकरण; चौघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: March 10, 2023 05:57 PM2023-03-10T17:57:55+5:302023-03-10T18:01:10+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पाच पैकी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बीड : माजलगाव शहरात ऐन धुळवडीच्या दिवशी भाजप कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर पाच जणांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पाच पैकी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी अद्याप फरारच आहे.
शेजूळ हल्ला प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, रामेश्वर टवानी यांच्यासह पाच जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या हल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप झाले होते. मंगला सोळंके यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. अधिवेशन सुरू असल्याने हे प्रकरण राज्यात गाजले होते. हल्लेखोरांना अटक करण्याचे आव्हान बीड पोलिसांसमोर होते. परंतू स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पाच पैकी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
यामध्ये अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय २६ रा.पुनंदगाव ता.माजलगाव), संदीप बबन शेळके (वय २२), सुभाष बबन करे (वय २७) व शरद भगवान कांबळे (वय २९ सर्व रा.पुरूषोत्तमपुरी ता.माजलगाव) यांचा समावेश आहे. तसेच एकजण अद्यापही फरार आहे. या सर्वांना माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, भगतसिंह दुल्लत, मोहन क्षीरसागर, सलीम शेख, नसीर शेख, मनोज वाघ, रामदास तांदळे, प्रसाद कदम, अशोक दुबाले, राहुल शिंदे, सतीश कातखडे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकी सुरवसे, गणेश मराडे आदींनी केली. दरम्यान याप्रकरणात आ.सोळंकेंसह मंगला सोळंके, रामेश्वर टवानी यांना अंतरीम जामीन मिळालेला आहे.