माजलगावचे उपविभागीय अधिकारी कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:30+5:302021-05-19T04:34:30+5:30
चार महिन्यांपासून पद रिक्त : लोकांची कामे खोळंबली माजलगाव : येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना चार महिन्यापूर्वी लाच ...
चार महिन्यांपासून पद रिक्त : लोकांची कामे खोळंबली
माजलगाव : येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना चार महिन्यापूर्वी लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्या निलंबनानंतर त्यांची जागा रिक्त असून पदभार इतर ठिकाणच्या अधिकाऱ्याकडे असल्याने हे कार्यालय वाऱ्यावर सोडले असून लोकांची कामे खोळंबली आहेत.
माजलगाव येथे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना ३ महिन्यांपूर्वी वाळू व्यावसायिकांकडून ६५ हजारांची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर या प्रकरणात निलंबन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने येथील पदाचा अतिरिक्त पदभार परळीच्या उपविभागीय अधिकारी चाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांना तेथील कामकाजाचा अगोदरच व्याप असताना इकडे येण्यास वेळ मिळत नाही, त्यातच कोविड साथीमुळे आणखी अडचणीची भर पडली आहे. या कार्यालयात भूसंपादन, विविध खटल्यांच्या तारखा प्रलंबित आहेत, त्याबद्दल लोक चकरा मारत आहेत. मात्र परळीच्या उपविभागीय अधिकारी चाटे या तीन महिन्यात केवळ बोटावर मोजण्या एवढ्या वेळेसच येथे येऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु प्रलंबित कामांचा निपटारा झालेला नाही. त्यामुळे प्रचंड संख्येने कामे प्रलंबित आहेत. असे असताना अद्यापपर्यंत शासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी दिलेला नाही, म्हणून तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
उपविभागीय अधिकारी नसल्यास या विभागात संपूर्ण जबाबदारी तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांच्यावर असते. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून परिस्थिती हाताळायची, असा दंडक आहे. मात्र तहसीलदार वैशाली पाटील या आपल्या कार्यालयाला कधी बाहेरून तर कधी आतमधून दार बंद करून आत बसून कामकाज करत आहेत. मात्र लॉकडाऊन काळात नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने, रहदारी सुरू, कोविड सेंटरमध्ये विना पाणी व लाईट विना रुग्णांचे हाल ,लसीकरण करण्यासाठी नागरिकांची गैरसोय असल्याच्या तक्रारी असताना त्यावर कारवाई होत नाही. पाटील यांनी अशा कुठल्याच ठोस कारवाई किंवा उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे लाॅकडाऊन असताना रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.