रस्त्यासाठी अनधिकृत मुरूम उपसा करणाऱ्या दिलीप बिल्डकॉनला 34 कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:35 PM2018-12-04T18:35:42+5:302018-12-04T18:38:06+5:30
तहसीलदार यांनी याबाबत रीतसर पंचनामा करून कंपनीला तब्बल 34 कोटी रुपयांचा दंड ठोठावला
माजलगाव (बीड ) : खामगाव- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी पैकी माजलगाव ते केज पर्यंतच्या रस्त्याचे काम दिलीप बिल्डकॉन ही भोपाळस्थित कंपनी करीत आहे. या टप्प्याचे काम करीत असताना पात्रुड येथील नदीचे खोलीकरण करण्याचे गाजर पुढे करीत येथून भरमसाठ मुरूम उपसा कंपनीने अनधिकृतरित्या केला. यावरून येथील तहसीलदार यांनी याबाबत रीतसर पंचनामा करून कंपनीला तब्बल 34 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये माजलगाव ते केज टप्प्याचे सिमेंटीकरण करण्याचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरू केले आहे. काम सुरु केल्यापासून कंपनी कायम या ना त्या कारणाने वादातीत राहिलेली आहे. माजलगाव शहरातील काम करीत असताना निकृष्ट दर्जाचे काम तसेच कामात अव्यवस्थितपणा तसेच इतर वादात कंपनी राहिलेली आहे. सदर रस्त्याचे काम करीत असताना कंपनीने विविध ठिकाणाहून मुरूम, खडी व इतर साहित्य घरचे असल्यासारखे स्थानिक काही लोकांना हाताशी धरून उचलले. अशाच प्रकारे पात्रुड येथील नदीचे खोलीकरण करण्याच्या नावाखाली तब्बल 59 हजार 767 ब्रास इतक्या मुरुमाचे उत्खनन केले.
या बाबतची कसलीही कल्पना महसूल खात्याला दिली नाही एव्हाना कोणी विचारल्यास कंपनी कसल्याही प्रकारची दाद देत नव्हती या बाबत तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून येथील तहसीलदार एन.जी. झंम्पलवाड यांनी सादर ठिकाणचा पंचनामा भूमीअभिलेख कार्यालयामार्फत इटीएस मशिनद्वारे मोजमाप करून सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविलेल्या अहवालावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील ठिकाणावरून 59 हजार 767 ब्रास मुरूम उपसा झाला असल्याचा अहवाल तहसील कार्यालयास दिला. त्यावरून तहसीलदार यांनी कंपनीस विनापरवाना मुरूम उत्खनन केल्या प्रकरणी 5 पट दंडासह तब्बल 33 कोटी 78 लाख 18 हजार 97 रुपये इतका दंड ठोठावण्याबाबत नोटीस बजावली असून दोन दिवसात पुराव्यासह आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
वरिष्ठस्तरावर निर्णय
आमची कंपनी फार मोठी असून अशा छोट्या गोष्टींवरील नोटीसवर उत्तर देण्याबाबत कंपनी वरिष्ठस्तरावर निर्णय घेईल.
- पंकजकुमार, प्रोजेक्ट मॅनेजर, दिलीप बिल्डकॉन
सक्तीने दंड वसुली
कंपनीने अनधिकृत उत्खनन परवान्यासंबंधी योग्य पुरावे सादर न केल्यास थेट कार्यवाही करून सक्तीने दंड वसुली करण्यात येईल
- एन.जी. झंम्पलवाड, तहसीलदार माजलगाव