लॉकडाऊनच्या निषेधार्थ माजलगावात शिथिल काळात व्यापाऱ्यांनी पाळला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 01:07 PM2021-03-26T13:07:10+5:302021-03-26T13:07:42+5:30
lockdown in Beed : जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात किराणा दुकानदारांचा निषेध
माजलगाव : लोकमानस विचारात न घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारला आहे अशा भावना शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. याच्या निषेधार्थ सकाळी देण्यात आलेली दोन तासांची सूट किराणा व्यापाऱ्यांनी धुडकावून लावत आज सकाळी दुकाने बंद ठेवली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. या काळात किराणा दुकानदारांना सकाळी ७ ते ९ अशी दोन तासांची सुट देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनचा निर्णय मनमानी पद्धतीचा असून व्यापार्यांना आर्थिक खाईत लोटणारा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे यापूर्वीच अतोनात नुकसान झाले आहे. ८० टक्के दुकानदार हे किरायाच्या जागेत व्यापार करतात. अशा दुकानदारांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबी विचारात न घेता लॉकडाऊनचा निर्णय लागू करून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना माजलगावात व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी माजलगावात किराणा व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापार करण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत धुडकावून लावत आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.