Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून सातजण मस्साजोगमध्ये लपले; पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:02 IST2025-03-25T14:59:04+5:302025-03-25T15:02:00+5:30
Pune Crime: मस्साजोगमध्ये मोठी कारवाई; पुण्यात विद्यार्थ्यावर हल्ला करून पळालेले सातजण पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून सातजण मस्साजोगमध्ये लपले; पोलिसांनी घेतले ताब्यात
- मधुकर सिरसट
केज (बीड) : पुणे जिल्ह्यातील कारेगाव (ता. शिरूर घोडनादी) येथील एका तरुणांवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून तीन दुचाकीवरून पळून आलेल्या सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल जवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची माहिती रांजणगाव पोलिसांनी वायरलेस वरून केज पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मस्साजोग शिवारात केज पोलिसांनी सापळा लावून सात जणांना जेरबंद केले आहे.
सौरभ श्रीराम राठोड (17) हा गंगाखेड (जि. परभणी) येथील युवक पुणे जिल्ह्यातील कारेगाव ( ता. शिरूर घोडनदी ) परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. 23 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सौरभ राठोड यास, 'तु ओंकार देशमुख यास खुन्नस देऊन का बघितलेस, ओंकार देशमुख कोण आहे? तुला माहित आहे कां? थांब तुला जिवंतच सोडीत नाहीत' अशी धमकी देत गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरूर घोडनदी) व दोन अनोळखी दोघांनी कोयत्याने वार केले. पोटात व पाठीवर वार करीत त्याच्या डोक्यात दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोडविण्यासाठी गेलेल्या यश राजू धनवटे यास हाताने व लाथाबुक्यांनी मारून दमदाटी केली. सौरभ राठोड याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून यश धनवटे याच्या फिर्यादीवरून वरील सात जणांसह इतर अनोळखी दोघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करीत होते.
आरोपीचे लोकेशन मस्साजोग शिवारात
या प्रकरणातील सातही आरोपी हे दुचाकीवरून बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्साजोग शिवारात पळून गेल्याची तांत्रिक माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाले. हीं माहिती त्यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना भ्रमनध्वनी वरून दिली. पाटील यांनी तात्काळ पोलीस उप निरीक्षक उमेश निकम, फौजदार मांजरगे, जमादार उमेश आघाव, बाळासाहेब अहंकारे यांचे पथक या परिसरात रवाना केले. या पथकाने सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरातून जेरबंद केले. सातही आरोपींना रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.