ताणतणाव टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:55+5:302021-01-20T04:32:55+5:30
गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. आपली जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण ...
गेवराई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. आपली जीवनशैली बदलल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होत आहेत. हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, वेळेवर जेवण, व्यायाम आणि आपले छंद जोपासणे यामुळे आपण ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा मानसिक आरोग्य विभागाचे डॉ. सुदाम मोगले यांनी केले.
येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती व आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. मंचावर रुग्णालयाचे डॉ. जाधव, डॉ. मते, उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रा. अशोक जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मते यांनी केले. आपल्या प्रमुख भाषणात डॉ. मोगले म्हणाले की, युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढत्या अपेक्षा या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात. भूक न लागणे, मानसिक केंद्रीकरण न होणे, ही ताणतणावाची लक्षणे आहेत. हृदयाचे विकार, कर्करोगासारखे गंभीर स्वरूपाचे आजार यामुळे निर्माण होतात. असे गंभीर आजार होऊ नयेत म्हणून योग्य जीवनशैली स्वीकारावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. सुदर्शना बढे यांनी केले. डॉ. वृषाली गव्हाणे यांनी आभार मानले. शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.