विधवा महिलेचा खून करून आत्महत्येचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:25 PM2019-02-17T23:25:33+5:302019-02-17T23:26:10+5:30
गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यामुळे सर्वांना आत्महत्या केल्याचे वाटावे. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या.
बीड/गेवराई : गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यामुळे सर्वांना आत्महत्या केल्याचे वाटावे. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या. ही घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडली. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगण्यात येत असून, मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.
अनिता विष्णु तुजारे (२५ रा. वरूळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ह.मु.उमापूर ता.गेवराई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झाला होता. तिचा पती आजारी होता. यातूनच त्याचे निधन झाले. तिला पतीपासून दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. पतीचे निधन झाल्यापासून अनिता ही उमापूर येथे माहेरीच राहत होती. माहेरी आल्यावर गल्लीतीच दत्ता किशन खरात याच्यासोबत तिची ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले. त्यानंतर त्यांच्यात संबंध आले. दत्ताही विवाहित असून, तो पाच मुलींचा बाप आहे. सहाव्यांदा त्याची पत्नी गर्भवती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. पत्नी असतानाही दत्ताने अनितासोबत अनैतिक संबंध ठेवले.
हा प्रकार समजल्यानंतर वाद झाले. याबाबत अनिता आणि दत्ताला वारंवार समजावण्यात आले. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. एवढेच नव्हे तर काही काळाने अनिता आणि दत्तामध्येही वाद वाढू लागले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात चांगलेच वाद वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अनिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरातच आढळला. ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांना संशय होता. शनिवारी सकाळी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये तिचा गळा आवळल्याचे कारण समोर आले. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंत्यसंस्कार पार पडल्यावर मयताच्या भावाला बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर खरा प्रकार समोर आला. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, यापूर्वीही माजलगाव तालुक्यातील शहाजनपूर येथेही पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढून आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी तपास करुन तो बनाव उघडकीस आणला.
चर्चेला मिळाला दुजोरा
पोलीस उमापूरमध्ये पोहचेपर्यंत नातेवाईकांनी गळफास काढून अनिताला खाली झोपवले होते. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी आल्या. त्यांना संशय आल्याने सपोनि नितीन पगार यांनी याबाबत आपले पथक कामाला लावले. तपासादरम्यान अनैतिक संबंधाची चर्चा कानावर आली. प्रकरण संवेदनशील असल्याने त्यांनी ते संयमाने हाताळले. अंत्यसंस्कार झाल्यावर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यांनी अनिताच्या भावाला बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी ऐकलेल्या चर्चेला अनिताच्या भावाकडून दुजोरा मिळाला आणि खूनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांचा संयम आणि कौशल्यपूर्णतेमुळे यातील सत्य बाहेर आले.