बीडमध्ये एटीएम पळविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मकोका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:14 AM2018-07-03T01:14:56+5:302018-07-03T01:15:21+5:30
राजुरी येथील एटीएम पळविणाºया टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली.
बीड : राजुरी येथील एटीएम पळविणा-या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली. आसाब दस्तगीर शेख (वय २२, रा. रोहतवाडी, ता. पाटोदा), विशाल बारीकराव राख (वय २९, रा.थेरला, ता.पाटोदा), बाळू भागवत मुंडे (२३, रा.खालापुरी, ता.शिरुर), श्रावण गणपत पवार (२३, रा. राजुरी, ता.बीड) अशी मकोका अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
१३ मे रोजी बीड शहरातील शाहूनगर भागातील एटीएम चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या टोळीने बीड तालुक्यातील राजुरी येथे जाऊन एसबीआयचे एटीएम पळविण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरने एटीएम मशीन वेगळी करुन ती एका जीपमधून नेली जात होती. परंतु ही माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले.
ज्या जीपमधून एटीएममध्ये नेले जात होते, त्या जीपला समोरुन ठोस देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. याचवेळी पोलीस आल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला होता. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास यातील तिघे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु दोघे मात्र फरारच होते. दोन दिवसानंतर राहिलेल्या दोघांनाही बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याविरोधात बीड ग्रामीण ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ग्रामीण ठाण्याचे सपोनि शीतलकुमार बल्लाळ यांना मकोकाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. अवघ्या दहा दिवसांत सर्व माहिती गोळा करुन पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. पाचपैकी चौघांविरोधात मकोका कारवाई करण्यास सोमवारी त्यांनी मंजुरी दिली. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधात कारवाई झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडाचे गजानन जाधव, ग्रामीणचे सपोनि शीतलकुमार बल्लाळ, शांताराम रोकडे, गणपत लोणके, रमेश दुबाले, मदन जगदाळे, दिनेश ढाकणे, गहिनीनाथ बावनकर, भागवत शेलार यांनी परिश्रम घेतले. अभिमन्यू औताडे यांनी सहकार्य केले.
नऊ जिल्ह्यांमध्ये घातला धुमाकूळ
वाहने अडवून लूटमार करणे, चारचाकी, दुचाकींची चोरी करणे, मारहाण करणे, जबरी चोरी करणे असे विविध गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत. बीडसह उस्मानाबाद, सातारा, बुलडाणा, अहमदनगर, पुणे, बारामती, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये या टोळीने धुमाकूळ घातला होता.
अखेर बीडमध्ये त्यांच्याविरोधात धाडसी कारवाई करण्यात यश आले.
आतापर्यंत ९ टोळ्यांवर मकोका
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बीडचा पदभार स्वीकारल्यापासून एटीएम चोरांसह ९ टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. सर्व पोलीस ठाण्यांकडून त्यांना यासाठी सहकार्य मिळाले. मागील काही वर्षांचा कालावधी पाहता मकोकाच्या एवढ्या मोठ्या कारवाया पहिल्यांदाच झाल्याचे सांगण्यात आले.