मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:39 AM2019-07-18T00:39:54+5:302019-07-18T00:40:37+5:30
येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
बीड : येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
जानेवारी २०१८ पासून या ३८ कर्मचा-यांना मासिक वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. विनावेतन काम करवून घेण्यासाठी नगर परिषदेने वेठबिगारीचा नवीन अवतार धारण केल्याचे शहरी हिवताप कर्मचारी व कामगार युनियनने म्हटले आहे. शासनाने मागविलेली माहिती न पाठविणे, शासकीय पत्र आणि परिपत्रकांची दखल न घेणे आदी कारणांमुळे कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. पाल्यांचे शिक्षण, आजारांवरील औषधोपचार, दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. या संदर्भात , मुख्यमंत्री , आरोग्य संचालक, आरोग्य विभागातील आयुक्त, जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून ठोस निर्णय होईपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचे युनियन अध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण, एच.एम. वीर, बी.एस. दहिवाळे, ए. व्ही वागमारे, कॉ. एस.बी. पवार, कॉ. रेंगे, कॉ.आर.आर. मोरे, कॉ.इंगळे, कॉ. शेख शहाबोद्दीन, शेख सत्तार, कॉ. जे. ए. पाटील, कॉ. अशोक जोगदंड आदींनी सांगितले.