मामा पाहू द्या बोट, ताप खोकला येतो का ? सर्दी पडसे नाही ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:45+5:302021-04-28T04:35:45+5:30
झिरो डेथ मिशन शिरूर कासार : मामा कोणाला ताप येतो का ? खोकला आहे का? सर्दी पडसे ...
झिरो डेथ मिशन
शिरूर कासार : मामा कोणाला ताप येतो का ? खोकला आहे का? सर्दी पडसे नाही ना, असे प्रश्न विचारत पाहू द्या तुमचे बोट असे म्हणत बोटाला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन पातळी तपासण्याचे व नोंदण्याचे काम तालुक्यातील ५०० शिक्षक करीत आहेत.
जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात देखील कोरोना बाधित रूग्णांचा वाढता आकडा पाहता घरोघरी जाऊन आजाराबाबत माहिती घेण्यासाठी झिरो डेथ मिशन मोहीम सुरू असून यात सुमारे ५०० कर्मचारी त्यात ४२५ शिक्षक ७५ महिला शिक्षकाच्या हातात ऑक्सिजन मापक यंत्र दिसत असून शेतकऱ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांसह अन्य कर्मचारी थेट बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद करीत आहेत.
तहसीलदार श्रीराम बेंडे ,गटविकास अधिकारी चव्हाण ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप ,गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांचे नियोजनातून ही मोहीम सुरू आहे. कोरोनाचा धसका आता सर्वांनीच घेतला असल्याने या मोहिमेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना प्रतिसाद दिला जात असल्याचे आदिनाथ गवळी यांनी सांगितले.
गतवर्षी पाऊस चांगला झाला होता परिणामी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगाम घेण्यासाठी शेतकरी व त्याचे कुटुंबीय उन्हातान्हात शेतात राबत आहेत.घर बंद असल्याने मिशन मधील शिक्षकांसह कर्मचारी थेट शेतावर बांधावर जाऊन माहिती घेत आहेत. सोमवारी गोमळवाड्यात आदिनाथ गवळीसह प्रशांत गंभिरे हे तपासणी करत मानसिक धीर देण्याचे काम करत होते.
कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनीच गांभीर्य ठेवले पाहिजे .काही दिवस तरी हा सामूहिक लढा लढावा लागणार असून त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ ,नागरिकांनी नियमावलीचे उल्लंघन करू नये असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी , गटविकास अधिकारी चव्हाण व गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी केले आहे .
===Photopath===
270421\vijaykumar gadekar_img-20210426-wa0076_14.jpg