बीडमध्ये दारुच्या नशेत दुचाकी चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
By संजय तिपाले | Published: September 25, 2022 06:24 PM2022-09-25T18:24:34+5:302022-09-25T18:24:47+5:30
२४ तासांत छडा, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
बीड: आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी खासगी दवाखान्यात आलेल्या शेतकऱ्रूाची दुचाकी नगर नाका येथून लंपास केल्याची घटना २४ सप्टेंबरला घडली होती. शिवाजीनगर ठाण्याच्या गुन्हे शाेध पथकाने (डीबी) २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्याचा छडा लावला. दारुच्या नशेत त्याने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले.
गणेश विठ्ठल भांडवलकर (३०,रा.संस्कार कॉलनी, बीड) असे आरोपीचे नाव आहे. अरुण लक्ष्मण राऊत (रा.म्हाळसापूर ता.बीड) हे दुचाकीवरुन (एमएच २३ व्ही-९६७३) आजारी मेहुण्यास भेटण्यासाठी शहरातील नगर नाका परिसरातील खासगी दवाखान्यात २४ रोजी सकाळी ११ वाजता पत्नीसह आले होते. रुग्णाला भेटण्यासाठी ते आत गेल्यावर गणेश भांडवलकर याने दारुच्या तर्रर्र नशेत त्यांची दुचाकी पळवली. अर्ध्या तासाने राऊत हे रुग्णालयाबाहेर आले असता दुचाकी गायब होती. त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात कळवून २५ रोजी गुन्हा नोंद केला.
सीसीटीव्ही फुटेजआधारे ठोकल्या बेड्या
उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि.केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हवालदार फेरोज पठाण, पाे.ना. शेख मोहसीन, अंमलदार सुदर्शन सारणीकर, विलास कांदे, राम सानप यांनी तपासचक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज आधारे गणेश भांडवलकर यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी सांगितले.