जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणारा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:28 AM2019-01-18T00:28:33+5:302019-01-18T00:29:03+5:30
जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली.
बीड : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली. दहशत निर्माण करून गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
राहुल प्रकाश तुपे (२२ रा.गोविंदनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुलने चार वर्षापूर्वी माळीवेस भागात गिफ्ट शॉपी टाकली होती. मात्र यामध्ये तोट्यात गेला. याचदरम्यान त्याची याच भागातील एका कुख्यात आरोपीसोबत मैत्री झाली. सहा महिन्यापूर्वी त्याने दुकान बंद केले. व्यसनाची सवय लागल्याने त्याला पैशाची चणचण जाणवू लागली. तीन महिन्यापूर्वी त्याने आपल्या मित्राकडून गावठी पिस्तूल २५ हजार रूपयांचा विकत घेतला. याच पिस्तुलाचा धाक दाखवून तो खंडणी व इतर गंभीर गुन्हे करण्याची तयारी करीत होता.
दरम्यान, राहुल हा आपल्या मित्रांसमवेत बार्शी रोडवरील एका हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलजवळ बाळगून मद्यपान करीत असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना समजले. त्यांनी तात्काळ सपोनि दिलीप तेजनकर आणि टिमला पाठविले. अचानक धाड टाकून पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर श्रीमंत उबाळे यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, गणेश दुधाळ, विष्णू चव्हाण, शेख नसीर, सुग्रीव रूपणर, नरेंद्र बांगर, श्रीमंत उबाळे आदींनी केली.