महिनाभरापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला झाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:08+5:302021-05-19T04:35:08+5:30

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : येथील मंडी बाजार परिसरात राहणा-या एका रुग्णाचा कोरोनाने उपचार सुरू असताना महिनाभरापूर्वी निधन झाले. या ...

The man who died a month ago had a corona | महिनाभरापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला झाला कोरोना

महिनाभरापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला झाला कोरोना

Next

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : येथील मंडी बाजार परिसरात राहणा-या एका रुग्णाचा कोरोनाने उपचार सुरू असताना महिनाभरापूर्वी निधन झाले. या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप बाहेर पडले नाहीत. तोच त्यांच्या कुटुंबियांना रविवारी रुग्णालयातून फोन खणाणला. धर्मेंद्र गुप्ता कोण आहेत? त्यांना कोरोना झाला असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवा. या फोनमुळ हे कुटुंब आश्चर्यचकीत झाले. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले. या घटनेला एक महिन्याच्या कालावधी लोटला. अचानक १६ मे रोजी आरोग्य विभागाने कोरोनाबधितांची यादी जाहीर केली. या जाहीर झालेल्या यादीमध्ये ५५ व्या क्रमांकावर धर्मेंद्र गुप्ता यांच्या नावाचा उल्लेख पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून करण्यात आला आहे. ते नवीन रुग्ण म्हणून निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे.

जे व्यक्ती कोरोनाबधित होतात, त्या व्यक्तींची यादी पडताळणीसाठी व त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. याकामी आरोग्य विभागागील कर्मचारी व शिक्षकांचे प्रभागनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीच्या नावासमोर असलेल्या मोबाईलवर फोन केला. अशा स्थितीत मयत झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा साक्षात्कार आरोग्य विभागाला झाला कसा? या अहवालावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.

...

ती आमची जबाबदारी नाही

आम्ही आरटीपीसीआर सँपल गोळा करण्याचे काम करीत नाहीत, फक्त चाचणी करणे हे आमच्या प्रयोगशाळेचे काम आहे. आमच्याकडे आलेल्या सॅम्पलला कोड नंबर असतात. चाचणीनंतर रुग्णाच्या नावासह करण्यात येणाऱ्या यादीची जबाबदारी आमची नाही.

- डॉ. संदीप निळेकर, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र.

...

सध्या कोरोनाबळीच्या प्रलंबित राहिलेल्या नोंदी वेबसाईटवर अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनावधानाने काही वेळेस जुन्या मयत रुग्णांची नावे पुन्हा यादीत येत आहेत. यानंतर अशा चुका होणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ.

- डॉ. बाळासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी.

Web Title: The man who died a month ago had a corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.