‘मानवलोक’च्या ८० खाटांच्या कोविड केअर सेंटरची उभारणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:30+5:302021-04-19T04:30:30+5:30
अंबाजोगाई : महाराष्ट्रात कोठेही नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर तेथील लोकांच्या मदतीसाठी तत्काळ धावून जाण्याची परंपरा मानवलोकने जोपासली आहे. ...
अंबाजोगाई : महाराष्ट्रात कोठेही नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर तेथील लोकांच्या मदतीसाठी तत्काळ धावून जाण्याची परंपरा मानवलोकने जोपासली आहे. या कोविडच्या साथीतही मानवलोक मागे राहिले नाही. अंबाजोगाई येथील मानवलोकच्या परिसरात ८० खाटांचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभे करून ते आरोग्य विभागाकडे हस्तांरित करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दिली.
मानवलोक ही सेवाभावी संस्था महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्तीचा प्रकोप झाला की, क्षणाचाही विलंब न लावता आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी तत्काळ धावून जाते. या पूर्वीही मराठवाड्यात किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपात मानवलोकचे संस्थापक स्व. डॉ. द्वारकादास लोहिया यांनी त्या परिसरातील गावे दत्तक घेऊन त्या गावांचे पुनर्वसन केले आहे. पूर परिस्थिती, दुष्काळी स्थिती अशी कोणतीही आपत्ती असो, त्या आपत्ती निवारणासाठी मानवलोकचा पुढाकार हमखास राहिलेला आहे. मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र अनिकेत लोहिया यांनी कायम ठेवला आहे. कोरोनाच्या साथीत मानवलोकने मोठे काम केले आहे. गेल्या मार्च महिन्यात उपेक्षित मजूर, कामगार व गरजू लोकांसाठी मानवलोकच्या वतीने पाच हजारांपेक्षा जास्त गरजूंना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. तसेच मास्कचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले होते. कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी मानवलोकने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता प्रशासन हे अद्ययावत ८० बेडचे कोविड केअर सेंटर कधी ताब्यात घेते याचीच प्रतीक्षा राहिली आहे.
सेवाभाव जोपासत परिपूर्ण सुविधा
बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने रुग्णांना बेड अपुरे पडू लागले आहेत. अशा स्थितीत सेवाभाव जोपासत अनिकेत लोहिया यांनी मानवलोकच्या मुख्यालयात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर करून सुसज्ज अशा ८० बेडच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांसाठी सुसज्ज असे स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अशा सर्व व्यवस्था व सुविधा परिपूर्ण करत ८० बेडची उभारणी झाली आहे.
===Photopath===
180421\fb_img_1618734760602_14.jpg~180421\fb_img_1618734757142_14.jpg