आसरडोहमध्ये विवाहापूर्वी मुला-मुलींना HIV तपासणी अनिवार्य; ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:58 PM2024-09-26T18:58:16+5:302024-09-26T19:02:32+5:30
आसरडोह ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला ऐतिहासिक निर्णय
धारूर (बीड) : तालूक्यातील आसरडोह ग्रामपंचायतीने विवाहापूर्वी मुला-मुलींना एचआयव्ही तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचा ऐतिहासिक ठराव आज ग्रामसभेत घेतला. असा ठराव घेणारी आसरडोह ग्रामपंचाय़त राज्यातील पहिली असल्याची माहिती सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांनी दिली.
आसरडोह ग्रामपंचायतीने आज सकाळी सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलविण्यात आली. यावेळी एचआयव्ही संदर्भात जनजागृती म्हणून गावातील मुला-मुलींना विवाहपूर्वी एचआयव्हीची तपासणी अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक ठराव घेतला. सदरील ठराव राजेसाहेब आबासाहेब देशमुख यांनी मांडला. ठरावास अनुमोदन वैजनाथ एकनाथ तरकसे यांनी दिले. ठरावास उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून मान्यता दिली. या ठरावाचे सर्वत्र कौतुक होत असून एचआयव्ही संदर्भात जागृती वाढणार असून आजूबाजूच्या ग्रामपंचायती देखील असा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी प्रेरित होतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामसभेस ग्रामसेवक मनोज डांगे, तालुका आरोग्य विभाग प्रतिनिधी डॉ.सय्यद नजीर, अंगणवाडी मदतनीस सुनिता तरकसे, आशा सेविका नरोटे, संस्था प्रतिनिधी नितीन घनघाव ,आरोग्य परिचारिका चौधरी व कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.