बाराव्या वर्षीच गळ्यात बांधलं मंगळसूत्र; सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:22+5:302021-07-31T04:34:22+5:30
बीड : शिक्षण घेण्याच्या वयातच एका बारावर्षीय मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही बाब समजताच बालकल्याण ...
बीड : शिक्षण घेण्याच्या वयातच एका बारावर्षीय मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही बाब समजताच बालकल्याण समितीने पोलिसांच्या मदतीने या मुलीची सुखरूप सुटका करून बालगृहात पाठविले. आता या मुलीच्या माहेरच्यांसह नातेवाइकांचा शोध घेणे सुरू आहे. बीड तालुक्यातील एका गावात हा प्रकार गुरुवारी उघड झाला.
अंबाजोगाई तालुक्यातील एका व्यक्तीला सहा मुली आहेत. पाचव्या क्रमांकाची मुलगी बारा वर्षांची आहे. तिचा विवाह बीड तालुक्यातील एका २२ वर्षीय मुलासोबत महिनाभरापूर्वी लावण्यात आला. त्यानंतर या मुलीला सासरी न ठेवता बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात ठेवण्यात आले. ही माहिती बालकल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे व अशोक तांगडे यांना समजली. त्यांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी लगेच पथकासह घरी जाऊन पाहणी केली असता मंगळसूत्र गळ्यात असलेली बारा वर्षांची मुलगी दिसली. तिला विश्वास देत सोबत घेऊन बालगृहात ठेवण्यात आले. सोबत बीड ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे व महिला पोलीस होते. दरम्यान, ही मुलगी सासर व माहेर सोडून त्रयस्थाच्या घरी कशी? तिचे लग्न अर्ध्या रात्री का लावले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, तपासानंतर याचा खुलासा होणार आहे.
नातेवाइकांचा शोध घेणे सुरू
ज्या घरात ही मुलगी सापडली ती नवरदेवाची गुरुबहीण असल्याचे सांगण्यात आले. तसेच तिच्या आई-वडिलांसह सासरच्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचेही जबाब घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---
एका विवाहित अल्पवयीन मुलीची माहिती मिळाली. पोलिसांना सोबत घेऊन या मुलीची सुटका केली. सध्या तिला बालगृहात ठेवण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलिसांमार्फत केली जाईल.
तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
---
सुटका केलेल्या मुलीला बालकल्याण समितीकडे सोपविले आहे. आता मुलीसह नातेवाइकांचे जबाब घेतले जातील. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
योगेश उबाळे, सपोनि बीड ग्रामीण पोलीस ठाणे