शेतीच्या वादातून झालेल्या मांगवडगाव तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:27 PM2022-02-03T17:27:03+5:302022-02-03T17:27:48+5:30
अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
अंबाजोगाई (जि.बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. याप्रकरणी पाच जणांना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा तर आठ जणांची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयाने बुधवारी ठोठावली. हे तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजले होते. सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर, बालासाहेब बाबूराव निंबाळकर, राजाभाऊ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
शेतीचा वाद अनेक वर्षांपासून धुमसत होता. बाबू शंकर पवार यांना २००६ मध्ये या वादातून मारहाण झाली होती. १३ मे २०२० रोजी सांयकाळी बाबू शंकर पवार व त्याचे मुले, सुना असे सर्व जण वादग्रस्त जमिनीवर संसारोपयोगी साहित्यासह ट्रॅक्टरमधून राहण्यासाठी गेले होते. यावेळी सर्व आरोपींनी चिडून त्यांच्यावर शस्त्रासह दगड फेकून प्राणघातक हल्ला केला व ट्रॅक्टर अंगावर घालून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच यावेळी आरोपींनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात बाबू शंकर पवार, संजय बाबू पवार, प्रकाश बाबू पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी दादुली प्रकाश पवार हिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. मारहाणीमध्ये धनराज बाबू पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबू पवार, संतोष संजय पवार हे गंभीर जखमी झाले होते. धनराज पवार यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव येथे ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. येथील जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
१६ साक्षीदार तपासले
सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक कुलकर्णी यांनी सोळा साक्षीदार तपासले. यात जखमी , डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी, पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर खटला हा आरोपींना कोठडीमध्ये ठेवूनच चालविण्यात आला. ॲड. अशोक कुलकर्णी यांना ॲड. आर. एम. ढेले, ॲड. नितीन पुजदेकर , पैरवी अधिकारी गोविंद कदम, बाबूराव सोडगीर यांनी सहकार्य केले.